प्रिय आई,
शि. सा. न. वि. वि.
तरी लिहण्याचं कारण कि बोलणं सध्या अशक्यए. न मी सांगण्याच्या परिस्थितीत आहे, न तू ऐकण्याच्या.
ऐकून घेण्याच्या,* रादर.
त्याचं असंय ना आई, मला अचानक आठवण आली गं तुझी. म्हणजे भरपूरदा खरं-खोटं, बऱ्या-वाईटाचा प्रश्न येतो ना, तेव्हा हमखास येऊन जाते मला तुझी आठवण. चूक काय, बरोबर काय, तूच शिकवलंस ना सगळ्यात आधी. सो तुझाच चेहरा येतो डोळ्यासमोर कोणत्याही गोष्टीची पारख करताना. हल्ली मात्र वाटायला लागलंय कि चांगुलपणा, खरं वागणं, बोलणं, हा सगळा नाटकीपणाय, भामटेपणाय. आणि भामटेपणा, खोटारडेपणा आला कि मी जाऊन पोचतो लगेच नाशकात(!); टीनेजपासून पाठ सुटता सुटत नाही मं करावं तरी काय, नैका. आठवतो मग तुझा तो कॉल, काय-काय बोललेलियेस तू मला–
तुला बीपीचा त्रास तेव्हाच सुरू झाला, कानै? सहन झालं नाही, मी तुझ्याशी खोटं बोललो, खोटं वागलो. पण कुणी शिकवलं मला, आई, खोटं बोलायला? कुणी शिकवलं, खोटं कसं वागतात, खरं कसं लपवतात न्कसं जन्माला घालतात फिक्शन? कुणी शिकवलं मला, हात धरून, पुरुषानं मनगट कसं हाताळायचं असतं ते? कुणी सांगितलं मला बाजूला नेऊन कि बायांच्या गाण्यांवर नाचणं बंद कर? नाच्या-नाच्या म्हणायचे आण्णा, नाना चिडवायचे, म्हणून तूच नाही का गं नटरंगाचा केला नट?
पोटच्या गोळ्याचं एकेक अंग छाटून निर्मिला तू, आई, हा दुर्योधन, तू अंगाच्या मळाने उभारला मला, तुझ्या स्त्रीत्वाला जेहीकाही नको होतं ते सगळं ओतून मोकळी झाली माझ्या घशात, गरज पडली तेव्हा शिरच्छेदही करवून घेतला माझा न्बसवला घरात गजानन. पण माझं काय, आई?
तू दिलेलं डोकं कितवर ताबा ठेवणारे गं ह्या शरीराचा, वेडाबाई? खांदा-कोपर-मनगट करेलंही कंट्रोल एकवेळ तुझ्या मर्जीनुसार - गुढगे पाय न्चालही कदाचित - पण त्या दोघा पायांच्या मधल्या खांबाचं काय, ज्याच्या बळावर करतेस तू मला वेगळा स्त्रीजातीपासून, जिथून हा सगळा प्रश्न निपजतोय? वासनेचं काय? प्रणयाचं काय, प्रेमाचं काय?
तुमचं साधं-सरळ-कुणबीमराठा-ओबीसी-मिडलक्लास जगणं हे थिएटर नाहीतर काये गं? काय होतं इथे नाटकाशिवाय?? माझ्या मूर्ख बापाचं सोड, पण आपण तिघंही किती लपाछपी खेळतो आई! खोटारडेपणा हा ह्या तुझ्या सरळमार्गी जगण्याचा एक अविभाज्य घटकय, तो काही बाहेर नाही ना शिकावा लागला मला?! चोरूनलपून आंबे खाणाऱ्या आज्जी असो, साखर-तूप चोरून शिरा करणाऱ्या काकूआज्जी असो नाहीतर लपूनछपून छकुलीला गॅदरिंगला नेणारी तू: मानगुटीवर पाय असताना श्वास घ्यायचा असेल तर घशाला भामटेपणा शिकावाच लागतो, मातुश्री!
असो.
"मी हिजड्याला जन्म नाही दिला!" आठवतं का? म्हणजे समजू शकतो मी: जेव्हा माझं मोजमाप करताना तुझ्याकडे असलेल्या पुरुषत्वाच्या व्याख्या अपुऱ्या पडायला लागल्या तेव्हा तूही साहजिकच खांब पाहून केला प्रयत्न मला दाबूनचोपून खांबाच्या कॅटेगरीत बसवायचा. शेवटी "मी नक्की कोणता रोल प्ले करायचाय" हे शिकवण्यासाठी "मी डेफिनेटली काय नाहीये" इथून सुरुवात करणं हे सगळ्यात सोयीस्कर, नैका. पण "हिजडा" नाही, तर तू नक्की कुणाला जन्म दिलाय हे तरी तुला कितपत ठाऊकए गं? का पोरका हट्ट धरावा कोणत्याही आईनं कि तिच्या मुलाला ती अंतरबाह्य ओळखते?! तुझ्या-माझ्यातलं अंतर हे काळानुसार फक्त वाढत जाणारं आहे, हे साधं सत्य तुला का मान्य नाही, आई? कोणएस तू, कैकेयी कि गांधारी? माझं अस्तित्व तुझी व्याख्या करतं, कि तुझा इतिहास ठरवतो माझं नशीब?
नशीबंच म्हणशील तू, न्नशीबाच्याच नावाने रडशील उद्या. देशील दोष देवाला न्दैवाला जेव्हा फुटल्या खांबावर मुखवटा सोडून उभा असेल मी तुझ्यासमोर. मारशील तू मला कदाचित, काढशील घराबाहेर, पण. त्याचं काय ए ना, मला रिअलाइज झालेलंय कि मी अत्यन्त स्वार्थी, घमेंडी, स्वतःवर जीवापाड प्रेम करणारा माणूसए. तू इतक्या मेहनतीने बसवलेला मुखवटा आता चिंधी-चिंधी होऊ लागलाय, आई.
मी बारावीला होतो तेव्हा तुला कळत नव्हतं, नैका, नक्की माझ्या डोक्यात काय चाललंय. हेच चाललं होत, सुरू झालेलं होतं, मास्क निसटू लागलं होतं. मी पुरुषांना भेटत होतो, त्यांना माझ्या बिछान्यात घेत होतो, त्यांच्यावर जीव ओवाळून टाकत होतो आणि माझ्या हाडांत रुजलेली, तू देऊ केलेली ही शरम मला जगू देत नव्हती. पण आता माझ्या हाडाचा न्मांसाचा एक-एक तुकडा, माझं अक्खं शरीर तुझ्यापासून ओरबाडून घेत मी रचलंय स्वतःला; आता पिछेहाट होणे नाही.
मला वनवाशी धाडायचं कि जिवे मारायचं, तुझं तू ठरव. मी बई थकलोय, हातवारे न्मनगट न्कंबर आवरत. तुझा निर्णय तुझ्यावर्तीच सोपवतो, न्थांबतो.
तुझाच,
गजानन.